कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा प्रश्न नसल्याचे अप्पर जिल्हाधिकार्यांचे मत
खाजगी रुग्णालये कोरोना रुग्णांची लूट करीत असल्याच्या आरोप नेहमीच होत असतो. आता जिल्हाधिकार्यांनी नियुक्त केलेल्या समितीनेही हाच निष्कर्ष काढला असून 409 रुग्णांची तब्बल 24 लाखांची लूट केल्याचा प्रकार समितीच्या चौकशीत आढळून आला आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालये रुग्णांची लूट करतात, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, या संदर्भात रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस वगैरे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी स्पष्ट केल्यामुळे रुग्णालयांना अभय देण्याचे धोरण जिल्हा प्रशासनाने अवलंबिले असल्याची चर्चा आहे.
कोरोना महामारीच्या काळात एकीकडे उद्योग-व्यवसाय ठप्प झाले असताना आणि हजारो नोकर्यांवर गदा आली असताना उपचाराच्या नावाखाली खासगी रुग्णालये रुग्णांची अक्षरशः लूट करीत आहेत. गेल्या चार महिन्यांच्या काळात हजारो रुग्णांना लाखो रुपयांचा गंडा या रुग्णालयांनी घातला. शासकीय महात्मा फुले जन आरोग्य योजनेला खो देत रुग्णांकडून लाखो रुपयांची बिले वसूल करण्यात आले. याबाबत ओरड झाल्यानंतर राज्य शासनाने प्रत्येक रूग्णालयाला ऑडिटरची नियुक्ती केली. त्याच बरोबर जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली बिल तपासणी समितीचीही स्थापना करण्यात आली. त्यानुसार शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांच्या बिलांची तपासणी या समितीने सुरू केली आहे. गेल्या महिनाभराच्या काळात समितीने 409 रुग्णांच्या बिलांची तपासणी केली आहे. त्यात तब्बल 24 लाख रुपये जास्त करण्यात आल्याचा निष्कर्ष या समितीने काढला आहे.
एका पीपीई किटचा भार सगळ्या रुग्णांवर !
खाजगी रुग्णालयांनी पीपीई किट हॅन्ड ग्लोज यासह डॉक्टर व्हिजिट असा भरमसाठ खर्च रुग्णांच्या माथी मारला आहे. विशेष म्हणजे एक डॉक्टर अथवा नर्स वार्डातील सर्व रुग्णांना एकाच वेळी तपासत असताना खर्च प्रत्येक किट चा खर्च रुग्णाच्या माथी मारण्यात आला. म्हणजे वीस रुग्ण जर एका वेळी तपासण्यात आले तर प्रत्येकाला एका किट चा खर्च देणे बंधनकारक होते. त्याचबरोबर सॅनिटीझेशन यासह इतर सुविधांचा भरमसाठ खर्च रुग्णांच्या माथी मारण्यात आला. दुसरीकडे व्हेंटिलेशन रुग्णांचा खर्च तर काही लाखांच्या घरात गेल्याचेही दिसून आले होते.
कोविड पॅकेज !
दरम्यान खासगी रुग्णालयांनी तर टूर ऑपरेटर प्रमाणे कोविड पॅकेजेस ठरवून दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अनेक रुग्णालयांनी तर जाहिरातबाजी योग्य दरात कोविड उपचार अशी जाहिराती केल्या. त्याचबरोबर सुविधा आणि उपचार किती उच्च दर्जाचे आहेत, हेही सांगण्याचा प्रकार अनेक रुग्णालयांनी केला आहे.
रुग्णालयांवर कारवाही नाही!
दरम्यान याबाबत अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अनंत गव्हाणे यांना विचारले असता त्यांनी ज्यादा बिल आकारल्याचे मान्य केले. मात्र त्या रुग्णालयांवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचेही स्पष्ट केले. रुग्णालयांनी बिल आकारणी केली तरी रुग्णाला बिलात सवलतही दिल्याचे गव्हाणे म्हणाले. त्यामुळे त्या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस वगैरे देण्याचा प्रश्नच येत नाही, असेही ते म्हणाले.












